पुणे येथील श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे ‘धनुर्मास’ उत्सव संपूर्ण भक्तिभावाने साजरा केला जातो. “धनुर्मास” ह्या काळात जीवनदेव विष्णू यांना संतुष्ट केले जाते. महिन्याच्या अखेरीस लक्ष्मीशी परमेश्वराचा विवाह संपला की मकर संक्रांतीची सुसंगत होते. मकरसंक्रांतीच्या शुभ दिवसाची सुरुवात देवांच्या लग्नापासून होते!
आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचं आपण पाहातो. मकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते.
आणि हा सुर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते या मकरसंक्राती पासुन! ‘मकर संक्रांत’ म्हणजे सूर्याने धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणे.
मकरसंक्रांतीची कथा
शंकरासुर नावाचा राक्षस जनतेला खूप त्रास देत असे. त्याला ठार मारण्यासाठी परमेश्वराने संक्रांतीदेवीचा अवतार घेतला.त्या संक्रांतीदेवीने शंकरासुर राक्षसाला ठार मारले.म्हणून मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासुर राक्षसाचा वध केला म्हणून दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. संक्रांतीचा आदला दिवस ‘ भोगी ‘ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत आणि खिचडी असा बेत केला जातो.
मकर संक्रांतीनंतर दिनमान वाढतो
सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसापासून दिनमान वाढत जाते. आपली पंचांगे सायन राशीचक्रावर आधारलेली नसून निरयन राशीचक्रावर आधारलेली आहेत. मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते.
२१ डिसेंबरला आपल्या इथे रात्र मोठी असते व या दिवसापासून दिनमान वाढत जाते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे सर्वत्र दिनमान व रात्रीमान समान असते. २१ जूनला आपल्याइथे दिनमान मोठे असते.नंतर हळूहळू ते कमी होऊ लागते. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशानी कललेला असल्यामुळे हे घडत असते.
संक्रांती नंतर सुर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण १० ते १५ दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते. असं म्हणतात की या रथसप्तमीपासुन सुर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात.
संक्रांत कशी साजरी करावी
संक्रांती पुण्यकालात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ भरलेले भांडे,लोकरीचे वस्त्र, तूप, सोने, भूमी, कपडे इत्यादी उपयुक्त वस्तू गरजू लोकांना दान म्हणून द्याव्यात असे सांगण्यात आले आहे.
कुणाशी मतभेद झाले असतील, कुणाशी भांडण झाले असेल, कुणाशी अबोला धरला गेला असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी त्या व्यक्तीला तिळगूळ देऊन “तिळगूळ घ्या आणि गोड बोला !“ असे सांगून मकर संक्रांतीच्या दिवसापासून हितसंबंध सुधारण्यासाठी प्रथम आपल्याकडूनच सुरुवात करावी. “इतरांना क्षमा करा आणि झाले गेले विसरून जा“ अशी शिकवण मकर संक्रांतीचा हा गोड सण आपणासर्वांस देत असतो.
मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. (हरभरे, मटर, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पहायला मिळतो)
ऊस, हरभरे, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगडयात भरून हे वाण महिला वर्ग ज्यापध्दतीने एकमेकिंना देतं त्याचप्रमाणे पंढरपुरच्या रूक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्यादिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करतांना दिसुन येतात.
मकर संक्रांतीला तिळाचे महत्व
मकरसंक्रांतीच्या दिवसात जास्त थंडी असते. या थंडीच्या दिवसात तीळ शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. तीळ हे चांगले शक्ती देणारे पौष्टिक औषध आहे. म्हणूनच मकर संक्रांतीला तीळ खाण्यास सांगितलेले आहेत. तीळाचे लाडू, तीळाचा हलवा, तीळगूळमिश्रित पोळी, तीळगुळाच्या वड्या इत्यादी पदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत.
मकरसंक्रांत आणि पतंग
मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. ही प्रथा गुजरातमधून महाराष्ट्रात आली. वाढत जाणाऱ्या दिनमानाच्या आनंदाप्रीत्यर्थ व सूर्याला वंदन करण्यासाठी पतंग उडविण्याची प्रथा सुरू झाली असावी.
सुवासिनी या दिवसांमध्ये हळदीकुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले पण बालगोपाळांचे काय ? तर मंडळी बालगोपाळ तल्लीन असतात आपल्या मोठया भावाबरोबर, मित्रमंडळींबरोबर वडीलधाऱ्या माणसांसोबत पंतग उडविण्यात.
भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव देखील आयोजित केल्या जातो. . . पतंग बनविण्याचे देखील शिकविण्यात येते.
पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहाण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरात ला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते.
या पतंग उडविण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सुर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंगी पेक्षा चांगले कारण कोणतेही असु शकत नाही. आणि म्हणुनच मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली असावी.
बोरन्हाण आणि तिळवण
वयाच्या पाच वर्षांपर्यंत लहान मुलामुलींना या मकरसंक्रांतीच्या काळात बोरन्हाण घालण्याची परंपरा फार पुर्वीपासुन सुरू असल्याचे आपल्याला दिसते.लहान मुलांना काळे कपडे घालुन, हलव्याचे दागीने घालुन सजवतात आणि हरभरे, उसाचे तुकडे, मुरमुरे, बोरं, हलवा, याचे मिश्रण त्यांच्या डोक्यावर टाकतात. आधुनिक काळात चाॅकलेट, बिस्कीटे, लहानांचे आवडते जिन्नस देखील त्यांच्या डोक्यावरून टाकले जातात.
नवे लग्न झालेल्या नववधुचे हळदीकुंकु या दिवसांमध्ये पहिल्यांदा मोठया प्रमाणात हौसेने करतांना आपण पाहातो याकरता तीच्यासाठी काळी साडी, हलव्याचे दागिने घालुन तिला सजविले जाते. संक्रांती दिवशी काळे कपडे का घालतात?
मकरसंक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र सूर्यप्रकाशातील ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवते आणि वाढलेल्या रात्रीला निरोप म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी महिला ‘ हळदीकुंकू ‘ समारंभही साजरे करतात.
कोणताही सण आपल्याला आनंद, उत्साह, नवचैतन्य, देण्याकरताच येत असतो. रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडींपासुन चार क्षण निवांत काढुन आपण देखील सणाचा हा अंगिकारतो त्यात रममाण होतो, भेटीगाठी होतात आणि या सण उत्सवापासुन मिळालेली उर्जा पुढे कित्येक दिवस आपल्याला रोजच्या दिनक्रमात जगण्याकरता उपयोगाला येते!
Like this:
Like Loading...